Thursday, 14 May 2020

लेखांक-18

लेखांक-1⃣8⃣

💢 *स्वअभ्यास*
इ.10 वी-विज्ञान भाग 2

प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1*
★★★★★★★★★

*आजचा स्वाध्याय*: 

1) या पोस्ट सोबत दिलेल्या ग्लुकोजच्या रचनासुत्राचे तुमच्या वहीमध्ये रेखाटन करा आणि त्यातील अणूंची संख्या मोजा. 

----★★★-------★★---

 *ऊर्जा निर्मिती रहस्य*

*श्रीकृष्ण*: हे पार्थ, कर्बोदकपासून ऊर्जा निर्मिती कशी होते हे तुला जाणून घ्यायचे आहे ना? 

*अर्जुन*: हो मधुसूदन! सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे.

*श्रीकृष्ण:* प्रथम तुला एका वाक्यात सांगतो. 
'पेशीमध्ये पचनसंस्थेतून आलेली पोषकद्रव्ये आणि श्वसनसंस्थेद्वारे मिळवलेले ऑक्सिजन यांच्यात ऑक्सिडीकरणाची क्रिया होऊन ऊर्जा निर्माण होते.'
परंतु ऊर्जा निर्मितीची ही प्रक्रिया एवढी सरळ-साधी नाही. त्यात अनेक घडामोडी होतात. त्या सविस्तर समजून घेण्यापूर्वी तू मला काही प्रश्नांची उत्तरे देशील का?

*अर्जुन:* ... मी उत्तरे द्यायची?
*श्रीकृष्ण:* हो, अगदी प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न आहेत. ग्लुकोजचे रेणुसूत्र सांगशील?

*अर्जुन:* सोपे आहे. C६H१२O६. ग्लुकोजच्या एका रेणूत कार्बनचे 6, हायड्रोजनचे 12 आणि ऑक्सिजनचे 6 अणू असतात. हे सहसंयुज संयुग आहे. या संयुगाची रचना चक्रीय म्हणजेच षटकोनी आहे. परंतु वासुदेव, ग्लुकोज म्हणजे कार्बोदकच ना? 

*श्रीकृष्ण:* ग्लुकोज हे कर्बोदकाचे एक उदाहरण आहे. अन्नातील जटील कर्बोदकांचेे पचनानंतर आपल्या शरीरात ग्लुकोज/फ्रुक्टोज/सुक्रोज या सारख्या साध्या संयुगात रूपांतर होते. आता मला सांग, 'अक्सिडीकरण' म्हणजे काय? 

*अर्जुन:* ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. यात संयुगाकडून ऑक्सिजन मिळवला जातो किंवा हायड्रोजन गमावला जातो. 

*श्रीकृष्ण:* खूप छान!
पेशीत साठवलेल्या ग्लुकोजचे ऑक्सिजनच्या साहाय्याने टप्प्या-टप्प्याने ऑक्सिडीकरण होते. या क्रियेत ऊर्जा मुक्त होते. यालाच '*पेशीश्वसन'* असे म्हणतात. निर्माण झालेली ऊर्जा पेशीतच ATP च्या स्वरूपात साठवली जाते. ATP म्हणजे Adenosine Tri Phosphate. हे एक ऊर्जा समृद्ध संयुग आहे. 

*अर्जुन:* परंतु हे वासुदेव, कालच तू म्हणत होतास की, ऊर्जा निर्मिती ऑक्सिजनच्या मदतीने आणि ऑक्सिजन शिवाय होते. ऑक्सिजन शिवाय ऊर्जा निर्मिती कशी काय होते? 

*श्रीकृष्ण:* हे पार्थ, तू फारच घाई करत आहेस. अजून आपण ऑक्सिजनच्या मदतीने ऊर्जा निर्मिती कशी होते हे पूर्णपणे समजून घेतललेे नाही. 

*अर्जुन:* म्हणजे त्यात अजून बारकावे आहेत? असे असेल तर मला सविस्तर सांगशील का?  

*श्रीकृष्ण:* सजीवांमध्ये होणारे श्वसन दोन प्रकारचे असते. एक म्हणजे ऑक्सिजनच्या मदतीने होणारे *'ऑक्सिश्वसन'* आणि ऑक्सिजन शिवाय होणारे '*विनॉक्सिश्वसन'*. प्रथम आपण ऑक्सिश्वसनाने ऊर्जा निर्मिती कशी होते ते समजून घेऊ..

ऑक्सिश्वसनामध्ये तीन टप्प्यात ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते. 

हे तीन टप्पे म्हणजे...
1) ग्लुकोजचे विघटन
2) ट्राय कार्बोक्झिलीक आम्ल चक्र
3) इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया.

हे पार्थ, हे तिन्ही टप्पे आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. तोपर्यंत तू पाठयपुस्तकातून या क्रिया वाचून समजून घेण्याचा प्रयत्न कर. 

*अर्जुन:* जशी तुझी आज्ञा!

...✍
*श्रीशैल मठपती,* कोल्हापूर

💢Ⓜ💢Ⓜ💢Ⓜ

No comments:

Post a Comment

लेखांक-32

लेखांक-3⃣2⃣ 💢 *स्वअभ्यास* इ.10 वी-विज्ञान भाग 2 प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1* ================ *आजचा स्वाध्याय* पाठ्यपुस्तकातील...