Thursday, 14 May 2020

लेखांक-17

लेखांक-1⃣7⃣

💢 *स्वअभ्यास*
इ.10 वी-विज्ञान भाग 2

प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1*
★★★★★★★★★

*आजचा स्वाध्याय*
खालील प्रश्नाचे उत्तर लिहा:

1) मानवी श्वसनसंस्थेत सहभागी इंद्रियांची क्रमवार नावे लिहा.

2) प्रत्येक इंद्रियांचे कार्य जाणून घ्या.

मानवी श्वसनसंस्था समजून घेण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी मारा आणि व्हिडीओ पहा.

https://youtu.be/PlNEabFZ5Qk

----★★★-------★★---

 *शरीर रहस्य* पुढे चालू...

*अर्जुन:* हे वासुदेव! काल तुझ्याबरोबर झालेली चर्चा आणि विज्ञान पुस्तकातील पान क्र. 10 वाचल्यानंतर मला बरीच माहिती मिळाली. परंतु हे मधुसूदन, त्यातून माझे शंका समाधान होण्याऐवजी नवीनच काही मूलभूत प्रश्न माझ्या मनी निर्माण झाले आहेत. तुझी परवानगी असेल तर विचारू का?
*श्रीकृष्ण:* हे पार्थ, प्रश्न निर्माण होणे हेच मुळी जिवंतपणाचे लक्षण आहे. तू निसंकोचपणे प्रश्न विचारतोस म्हणूनच तू माझा आवडता सखा आहेस. विचार!

*अर्जुन:* पोषद्रव्यांपासून शरीरात ऊर्जा कशी निर्माण होते?
*श्रीकृष्ण:* हे पार्थ, सर्व पोषद्रव्यांपासून ऊर्जा निर्माण होत नाही हे प्रथम लक्षात घे. प्रामुख्याने कर्बोदके आणि मेदापासून ऊर्जा निर्माण होते. आपल्या शरीरात 60 ते 80% ऊर्जा ही कर्बोदकांपासून निर्माण केली जाते. 

*अर्जुन:* कर्बोदकापासून जास्त ऊर्जा निर्माण होत असल्यामुळे आपल्या आहारात तृणधान्याचे प्रमाण जास्त असते, असेच ना? परंतु कर्बोदकापासुन ऊर्जा कशी निर्माण होते?

*श्रीकृष्ण:* ही एक क्लिष्ट प्रक्रिया आहे. ती समजून घेण्यापूर्वी आपणाला मानवी पचनसंस्था आणि श्वसन संस्थेचे कार्य कसे चालते हे माहीत असणे गरजेचे आहे. याविषयी आपण स्वाध्याय सोडवला असल्यामुळे या प्रक्रिया मी इथे अगदी थोडक्यात सांगतो.

🔹 *पचनसंस्था*

अन्नामध्ये जटील कार्बनी संयुगे असतात. जठर आणि स्वादुपिंडात असणाऱ्या अनेक विकरांची प्रक्रिया होऊन पचलेले अन्न लहान आतड्यात येते. तिथे अनेक रक्त केशिकांचे जाळे व उदवर्ध असतात. त्यांच्यामार्फत अन्नातील पोषद्रव्ये रक्तात शोषून घेतली जातात. या क्रियेला 'अवशोषण' असे म्हणतात. रक्तात शोषलेली ही द्रव्ये रक्तातील तांबड्या पेशी मार्फत शरीराच्या अन्य भागात वहन केली जातात. याप्रमाणे आपल्या शरीरात करोडोंच्या संख्येने असणाऱ्या प्रत्येक पेशीपर्यंत पोषद्रव्ये पोहोचवले जातात. ही पोषद्रव्ये पेशीत साठवली जातात. 

🔹 *श्वसनसंस्था*

पेशीत जमा झालेल्या पोषद्रव्याचे ज्वलन (ऑक्सिडेशन) झाल्याशिवाय त्यापासून ऊर्जा निर्माण होत नाही. ऑक्सिडेशनसाठी ऑक्सिजनची गरज असते. हा ऑक्सिजन श्वसन प्रक्रियेने प्रत्येक पेशीत पोहोचतो. 
सजीवांचे श्वसन हे शरीरस्तर आणि  पेशीस्तर अशा दोन स्तरावर होते. शरीरस्तरावरील श्वसनात जेव्हा आम्ही श्वास घेतो, तेव्हा हवा फुफ्फुसातील वायूकोशापर्यंत जाते. वायू कोशाभोवती रक्त केशिकांचे जाळे असते. तिथे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्सिइड या वायूंची देवाण-घेवाण होते.  विसरण पद्धतीने हवेतील ऑक्सिजन रक्तात शोषला जातो  रक्तातील तांबड्या पेशी ऑक्सिजनचा रेणू  घेऊन हृदयाच्या डाव्या आलिंदात येतात. तिथून डावे निलय आणि महाधमनी मार्गे ऑक्सिजन संपूर्ण शरीरभर पोहोचवला जातो. पेशीस्तरावर होणाऱ्या श्वासनात पेशीकडून रक्तातून आलेला ऑक्सिजन स्वीकारला जातो. पेशीत यापूर्वीच जमा झालेल्या कर्बोदकाचे ऑक्सिजनच्या सहायाने अथवा विशिष्ट परिस्थितीत त्याच्याविना ऑक्सिडेशन होते आणि त्या प्रक्रियेत ऊर्जा मुक्त होते. मुक्त झालेली ऊर्जा पेशीतच ATP च्या स्वरूपात साठवली जाते आणि गरजेच्या वेळी वापरली जाते. 

*अर्जुन:* हे देवकीनंदन, ही सगळी प्रक्रिया माझ्या लक्षात आली. परंतु कर्बोदकांच्या ऑक्सिडीकरणातून ऊर्जा कशी निर्माण होते हे सविस्तर सांगशील का?

*श्रीकृष्ण:* हे पार्थ, तुझी जिज्ञासा पाहून मला आनंद झाला. मात्र आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या तुझ्या प्रश्नाचे नक्की उत्तर देईन. तोपर्यंत शक्य झाल्यास पाठयपुस्तकातील पृष्ठ क्र. 13 व 14 वरील मजकूर समजपूर्वक वाचून घे, म्हणजे उद्याची चर्चा तुला सहज समजेल. 

...✍
*श्रीशैल मठपती,* कोल्हापूर

💢Ⓜ💢Ⓜ💢Ⓜ

No comments:

Post a Comment

लेखांक-32

लेखांक-3⃣2⃣ 💢 *स्वअभ्यास* इ.10 वी-विज्ञान भाग 2 प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1* ================ *आजचा स्वाध्याय* पाठ्यपुस्तकातील...