लेखांक-2⃣6⃣
💢 *स्वअभ्यास*
इ.10 वी-विज्ञान भाग 2
प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1*
★★★★★★★★★
*आजचा स्वाध्याय*:
1) शक्य असेल तर इयत्ता 8 वी चे विज्ञान पुस्तक मिळवून त्यातील "पेशी व पेशी अंगके" हे प्रकरण समजपूर्वक वाचा.
★★★★★★★★★★★
*पेशींचे अंतरंग*
*अर्जुन:*- हे केशव, पेशी विभाजना विषयीची माहिती मला जाणून घ्यायची आहे. तत्पूर्वी मला सांग शरीरातील सर्व पेशींचे विभाजन होते का?
*श्रीकृष्ण:*- हे पार्थ, खूप चांगला प्रश्न विचारलास! मानवी शरीरात विविध प्रकारच्या पेशी व ऊती असतात हे आपण इयत्ता नववीत शिकलो आहोत. यापैकी हृदयातील पेशी, चेता पेशी, कांही स्नायू पेशी, रक्तातील तांबड्या पेशी यासारख्या पेशींचे विभाजन होत नाही. मात्र या पेशी शरीरात तयार केल्या जातात. उर्वरित पेशींचे विविध प्रकारे पेशीविभाजन होते.
*अर्जुन:* - म्हणजे पेशीविभाजनाचे सुद्धा विविध प्रकार आहेत?
*श्रीकृष्ण:*- हो पार्थ, पेशीविभाजन तीन प्रकारे होते. 1) द्विविभाजन 2) सूत्री विभाजन आणि 3) अर्धसूत्री विभाजन.
*अर्जुन:*- पेशी कोणत्या प्रकारे विभाजीत होते हे कसे ओळखायचे?
*श्रीकृष्ण:*- मानवी शरीरातील पेशींचे मुख्य दोन प्रकार पडतात. 1) कायिक पेशी आणि 2) जनन पेशी. कायिक (काया = शरीर) पेशी शरीरात सर्वत्र आढळतात. जनन पेशी (लिंग पेशी) जननेंद्रियात आढळतात. सूत्री विभाजन कायिक पेशीत तर अर्धसूत्री विभाजन जनन पेशीत घडून येते. काही एकपेशीय सुक्ष्मजीवांमध्ये द्विभाजन आढळते.
*अर्जुन:*- हे केशव, मला द्विभाजन, सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन या शब्दांचा अर्थ समजला नाही.
*श्रीकृष्ण:*- हे पार्थ, या तीनही शब्दांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत पण टप्प्या-टप्प्याने. प्रारंभी आपण सूत्री विभाजन समजून घेणार आहोत. तत्पूर्वी पेशींमधील अंगकांची नावे तुला सांगता येतील का?
*अर्जुन:*- थोडी नावे सांगता येतील. जसे की, केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, गोल्जिपिंड, रिक्तिका, लवके, लयकरिका इत्यादी.
*श्रीकृष्ण:*- खूप छान! बहुतेक अंगकांची नावे तुला आठवतात. पेशीमध्ये या प्रत्येक अंगकाना वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. प्रत्येकाचे कार्य महत्वपूर्ण आहे. आजच्या स्वाध्यायमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे इयत्ता 8 वी च्या पुस्तकात पेशींच्या अंगकांची सविस्तर माहिती दिली आहे. शक्य झाल्यास ती माहिती वाचून, समजून घे. म्हणजे पेशीविभाजन हा भाग तुला समजायला मदत होईल. ठीक आहे.....पुन्हा उद्या भेटू.
*अर्जुन:*- धन्यवाद वासुदेव!
■■■
...✍
*श्रीशैल मठपती,* कोल्हापूर
(9922242470)
💢Ⓜ💢Ⓜ💢Ⓜ
No comments:
Post a Comment