Thursday, 14 May 2020

लेखांक- 3

लेखांक- 3

💢 इयत्ता 10 वी
*विज्ञान भाग 2 : स्वअभ्यास*

प्रकरण 1 : *आनुवंशिकता व उत्क्रांती*
★★★★★★★★★

*अवांतर पण आवश्यक:*

काल आपण DNA आणि RNA ची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. आज इथे त्याविषयी आणखी थोडे सविस्तर लिहीत आहे. 

■ DNA म्हणजे Deoxyribo Nuclic Acid होय. 
◆ यात de=deduction म्हणजे कमी होणे किंवा गमावणे. Deoxy म्हणजे ऑक्सिजन गमावणे. 
◆ ribo किंवा ribose म्हणजे पंचकार्बनी (पाच कार्बन असणारा) पेंटोज शर्करा रेणू होय. 
◆ Nuclic Acid म्हणजे  पेशींच्या केंद्रकात (Nucleus मध्ये) आढळणारे आम्ल होय.

यावरून DNA हे पेशींच्या केंद्रकात आढळणारे आम्ल असून ते ऑक्सिजन गमावून तयार झालेल्या पेंटोज शर्करा रेणुपासून बनलेले असते हे तुमच्या लक्षात आले असेल.

🔹 *DNA आणि RNA मधील महत्वाचा फरक:*

1. ही दोन्ही न्यूक्लिओटाईडची बहुवारीके आहेत. DNA मध्ये A,C,G,T आणि RNA मध्ये A,C,G,U हे नत्रयुक्त रेणू असतात. म्हणजे RNA मध्ये थायमिन (T) ऐवजी युरॅसिल (U) असते. 
2. DNA केंद्रकात असतात तर RNA पेशींद्रवात आढळतात.
3. DNA दोन खांबानी बनलेला द्विसर्पिल सिडीसारखा असतो. तर RNA एखाच खांबाचा (strand चा) बनलेला असतो. 
(सोबत दिलेली आकृती पहा.)

🔹 DNA रेणू पेशींच्या विविध कार्यावर नियंत्रण ठेवते. त्याचप्रमाणे *प्रथिन संश्लेषणामध्ये* सुद्धा महत्वाची भूमिका बजावते. 

🔹 *प्रथिन म्हणजे काय?*
प्रथिन हे सजीवांसाठी अत्यावश्यक पोषद्रव्य आहे. सजीवांच्या शरीर बांधणीसाठी विविध प्रकारच्या प्रथिनांची आवश्यकता असते. 

🔹 *प्रथिन संश्लेषण म्हणजे काय?*
प्रथिने अमिनो आम्लापासून बनलेली असतात. या अमिनो आम्लाच्या रेणूंची जोडणी होऊन इच्छित प्रथिन तयार होते.

कोणते प्रथिन तयार करायचे आहे?, त्यासाठी कोणती अमिनो आम्ले, कोणत्या क्रमाने जोडायची? हे DNA ठरवतो. म्हणून प्रथिन निर्मितीमध्ये DNA ची भूमिका महत्वाची आहे. 

🔹 इ. 10 वी मध्ये आपण प्रथिन संश्लेषण नेमके कसे होते हे शिकणार आहोत. त्यासाठी विज्ञान 2 पुस्तकातील पान नंबर 1 व 2 वरील प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण या तीन टप्प्याचे समजपूर्वक वाचन करा. वाचनानंतर खालील प्रश्नाची उत्तरे वहीत लिहा. 

🔹 *प्रश्न:*
◆ प्रथिन निर्मितीविषयी माहिती कुठे साठवलेली असते?
◆ प्रथिन निर्मिती कुणामुळे होते?
◆ mRNA ची निर्मिती कुठे व कशी होते?
◆ प्रतिलेखन म्हणजे काय?
◆ ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय?  
◆ भाषांतरण म्हणजे काय?
◆ स्थानांतरण म्हणजे काय? 
-----------------------------
प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण या तीन टप्प्यात प्रथिन निर्मिती होते. या तिन्ही क्रिया परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. त्यासाठी हा घटक पुन्हा-पुन्हा वाचून या क्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करा. उद्या आपण आणखी यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. 

...✍
श्रीशैल मठपती, कोल्हापूर

💢Ⓜ💢Ⓜ💢Ⓜ

No comments:

Post a Comment